Ratnagiri Fisheries LED Fishing Operation: रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय विभागाचे ‘ऑपरेशन निशाचर’; दापोली समुद्रात धाडसी कारवाई करत अवैध एलईडी मासेमारी नौका पकडली

Ratnagiri Fisheries LED Fishing Operation: रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय विभागाचे ‘ऑपरेशन निशाचर’; दापोली समुद्रात धाडसी कारवाई करत अवैध एलईडी मासेमारी नौका पकडली

प्रतिकूल हवामान आणि उंच लाटांमध्ये मध्यरात्री कारवाई; रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ नौका जप्त, तर दोन नौकांचे एलईडी दिवे नष्ट

रत्नागिरी : Ratnagiri Fisheries LED Fishing Operation संदर्भात जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांकडून मिळणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन निशाचर’ ही अत्यंत गुप्त आणि धाडसी मोहीम राबवली. समुद्रातील प्रतिकूल हवामान, जोरदार वारे, उफाळणाऱ्या उंच लाटा आणि नियमित गस्ती नौका उपलब्ध नसतानाही विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास दापोली तालुक्यातील अंजर्ले किनारपट्टीसमोर धडक कारवाई केली. या कारवाईत रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ या बेकायदेशीर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकेला रंगेहात पकडण्यात आले.

रत्नागिरी विभागाची नियमित गस्ती नौका काही दिवसांपासून बंद असल्याने अवैध मासेमारी रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र, स्थानिक पारंपारिक मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विभागाने थेट मुंबईहून पर्यायी गस्ती नौका मागवून दापोली किनारपट्टीवर गुप्त रणनीती आखली.

आव्हानात्मक परिस्थितीत ‘ऑपरेशन निशाचर’; २ नौकांचे एलईडी दिवे उद्ध्वस्त
समुद्रातील वादळी वारे आणि उंच लाटांच्या आव्हानात्मक परिस्थितीतही गस्ती पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मध्यरात्री ही मोहीम फत्ते केली. या कारवाई दरम्यान अंजर्ले किनारपट्टीसमोर रायगड जिल्ह्यातील आणखी दोन बेकायदेशीर एलईडी मासेमारी नौका उपस्थित असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मात्र, समुद्रातील खराब हवामानाचा फायदा घेत या दोन्ही नौका पसार होण्यात यशस्वी झाल्या. तरीही गस्ती पथकाने अत्यंत तत्परता दाखवत त्या दोन्ही नौकांवरील बेकायदेशीर एलईडी दिव्यांचे प्रचंड नुकसान करून ते नष्ट केले.

Mobile hub

या विशेष मोहिमेत परवाना अधिकारी (रत्नागिरी) चिन्मय जोशी, परवाना अधिकारी (गुहागर) स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी (साखरी नाटे) पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक सचिन सुद यांनी प्रत्यक्ष समुद्रात उतरून जीवाची बाजी लावत सहभाग घेतला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम; मर्यादित मनुष्यबळात धडक कामगिरी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, सहआयुक्त नागनाथ भादुले आणि रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त जीवन सावंत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागात मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असून अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभाराचा ताण आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांनी स्वतः सागरी गस्तीत भाग घेत अवैध मासेमारीविरोधात कडक पाऊल उचलले आहे.

एलईडी दिव्यांच्या साहाय्याने केली जाणारी अवैध मासेमारी ही सागरी पर्यावरणाला घातक ठरत असून स्थानिक पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा आणत आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणाचे रक्षण आणि कायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हितासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरूच राहतील, असा सज्जड इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.