जलसेवा गौरव पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान; जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री, आमदारांच्या उपस्थितीत आयोजन
रत्नागिरी : Ratnagiri Sustainable Water Conference संदर्भात रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रत्नागिरीत ‘शाश्वत पाणी परिषदे’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वाढते हवामान बदल, अल् निनोचे सावट आणि भविष्यात उद्भवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर ठोस व प्रभावी उपाययोजना आखण्याच्या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजक राजू भाटलेकर यांनी दिली.
ही परिषद गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. या परिषदेत जिल्ह्यातील पाणी चळवळ अधिक मजबूत करणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना ‘जलसेवा गौरव पुरस्कार’ देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
‘जलसेवा गौरव पुरस्कार’ विजेते मान्यवर
पाणी वाचवण्यासाठी आणि जलसंधारणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील व्यक्ती व संस्थांना या परिषदेत गौरवण्यात येणार आहे:

कुवारबाव येथील अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम पालव
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास परांजपे
जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे
दिगंत स्वराज फाउंडेशनचे संचालक राहुल तिवरेकर
झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे
देवरूख येथील सामाजिक कार्यकर्त्या चैत्राली धस
गुहागरचे आशुतोष जोशी आणि दापोलीचे डॉ. प्रशांत परांजपे
चिपळूणचे शाहनवाज शहा व मजगाव येथील फैय्याज मुकादम
डोंबिवली येथील उमेश मुंडले
हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर
रत्नागिरी नगरपालिकेचे पाणी सभापती निमेश नायर
दिवसभर व्याख्याने आणि कृती आराखड्याचे नियोजन
परिषदेदरम्यान दिवसभरात विविध तज्ज्ञांची व्याख्याने, भविष्यातील कृती आराखडा (Action Plan) तयार करणे आणि पाणी बचतीचे यशस्वी प्रयोग यावर अनुभवकथन होणार आहे. यामध्ये डॉ. प्रशांत परांजपे, डॉ. चंद्रशेखर निमकर, राहुल तिवरेकर आणि उमेश मुंडले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नंदू तांबे, शाहनवाज शहा, रोहन इंगवले, नीलम पालव व सतीश कदम विविध विषयांवर विचार मांडणार आहेत.
या पाणी परिषदेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचा मुख्य उद्देश आणि आवाहने
कमी झालेल्या पावसामुळे धरणे, तलाव आणि विहिरींमधील पाणीपातळी घटत असल्याने पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करणे काळाची गरज बनली आहे. पिण्याचे पाणी, रुग्णालये, सार्वजनिक संस्था, पशुधन, घरगुती वापर, शेती आणि उद्योग या प्राधान्यक्रमाने पाणीवाटप निश्चित केले पाहिजे, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. या परिषदेस जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, ग्रामसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि जलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू भाटलेकर यांनी केले आहे.













