कुर्धे मेर्वी येथील घटना; प्राथमिक तपासणीनंतर रानडुकराला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
रत्नागिरी : Ratnagiri Kurdhe Mervi Wild Boar Rescue संदर्भात रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे मेर्वी येथे ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या एका रानडुकराला वनविभागाच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. विहिरीतून सुटका केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रानडुकराची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगल परिसरात) सुखरूप मुक्त करण्यात आले.
मंगळवारी (२७ ऑक्टोबर) मौजे कुर्धे मेर्वी येथील श्रीमती शुभदा महेश पाध्ये यांच्या मालकीच्या विहिरीत एक रानडुक्कर पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
१५ फूट पाण्यात पिंजरा सोडून केली थरारक सुटका
वनविभागाच्या पथकाने पाहणी केली असता विहिरीतील पाण्यात रानडुक्कर पोहत असल्याचे दिसून आले. सदर विहीर सुमारे १५ फूट गोलाईची, ४५ फूट खोल आणि त्यात तब्बल १५ फूट पाण्याची पातळी होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि वेळेचे भान ठेवत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीच्या पाण्यात सावधगिरीने पिंजरा सोडला. काही वेळातच रानडुकराला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.

त्यानंतर हरचेरी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून रानडुकराची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. रानडुक्कर पूर्णपणे सुस्थितीत व निरोगी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगताच त्याला जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी रेस्क्यू मोहीम रत्नागिरी-चिपळूण विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, वनरक्षक शर्वरी कदम, महेश धोत्रे, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, सर्पमित्र वरद हळबे आणि आरआरटीचे (RRT) इशांत खानोलकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. वनविभागाच्या या तत्परतेमुळे आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एका वन्यजीवाचा जीव वाचल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.













