किचन शेडमधील घटना; सिलेंडरचा पाईप सुरक्षित करत मंगेश बारगोडे, विकास बारगोडे व रामचंद्र मापारले यांनी दाखवले धाडस, शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुहागर : Guhagar School Pressure Cooker Blast संदर्भात गुहागर तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराचे जेवण बनवत असताना अचानक कुकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही दुर्घटना शाळेच्या शेजारी असलेल्या किचन शेडमध्ये घडली. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, स्थानिक ग्रामस्थांनी वेळेवर दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शाळेतील लहान मुलांसाठी पोषण आहार शिजवण्याचे काम किचन शेडमध्ये सुरू असताना अचानक कुकरचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला. यामुळे शाळा परिसर आणि परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली.
ग्रामस्थांचे धाडस; सिलेंडरचा पाईप केला सुरक्षित
स्फोटाचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ मंगेश बारगोडे, विकास बारगोडे आणि रामचंद्र मापारले यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. आगीचा आणि गॅस सिलेंडरचा संभाव्य मोठा धोका लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत धाडसाने परिस्थिती हाताळली. त्यांनी तातडीने गॅस सिलेंडरचा पाईप सुरक्षित करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे शाळेत घडणारा मोठा अपघात आणि जीवितहानी टळली.

घटना घडल्याचे समजताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, अमरदीप परचुरे, रायचंद गळवे तसेच गुहागरच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विद्यार्थी व स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची विचारपूस करून त्यांची आस्थेने चौकशी केली, तसेच संकटाच्या वेळी प्राणांची पर्वा न करता पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांचे कौतुक केले.
उपकरणांच्या तपासणीची व सखोल चौकशीची मागणी
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवणाऱ्या स्वयंपाकघरातच असा गंभीर अपघात घडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात शालेय सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे कुकर, गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप व इतर उपकरणांची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का? तसेच तेथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना उपलब्ध आहेत का? याची प्रशासनाने सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. चिमुकल्यांच्या जिवाशी संबंधित हा संवेदनशील विषय असल्याने संबंधित शिक्षण विभाग व वरिष्ठ यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर तसेच निष्काळजीपणावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांमधून केली जात आहे.













