गोंडेसखळ रस्त्यावरील झाडीत सुरू होता प्रकार; पोलीस कॉन्स्टेबलाच्या फिर्यादीवरून एनडीपीएस ॲक्टनुसार कारवाई
Ratnagiri Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात बेकायदेशीररीत्या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी रंगेहात कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कुणाल मदन होलम (वय ४०, रा. लांजा एस.टी. स्टँडजवळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गोंडेसखळ रस्त्यावरील निर्जन सड्यावर ही कारवाई करण्यात आली.
गस्तीदरम्यान संशयास्पद हालचालींवरून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे (ब.नं. १०७) व त्यांचे सहकारी गोंडेसखळ रोड परिसरात नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. यावेळी आरोपी कुणाल होलम हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तातडीने तेथे जाऊन खातरजमा केली असता, आरोपी बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे स्पष्ट झाले.
एन.डी.पी.एस. ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात आरोपी कुणाल होलम याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५) चे कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्जन ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर झालेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.














