Devendra Fadnavis: “राजकारणात मतभेद असले तरी आम्ही एकत्र येऊ शकतो, चहाही पिऊ शकतो…”; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दिलखुलास भाष्य

Devendra Fadnavis: "राजकारणात मतभेद असले तरी आम्ही एकत्र येऊ शकतो, चहाही पिऊ शकतो..."; 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दिलखुलास भाष्य

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि संवाद जपणारी परंपरा कायम

Devendra Fadnavis: "प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते, ज्याला ज्या क्षेत्रात गती आहे, त्याने त्याच क्षेत्रात उत्तम काम केले पाहिजे. मला राजकारणच समजतं, म्हणून मी राजकारणातच काम करतो. आता राज ठाकरे इतके उत्तम व्यंगचित्रकार आहेत आणि उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत, त्यामुळे त्यांनी मला राजकारणात चांगले काम करू दिले पाहिजे," अशी कोटी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडवला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकलेचा १०० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

दादरमधील सावरकर स्मारक सभागृहात रंगला सोहळा
ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने दादर येथील ऐतिहासिक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा अत्यंत महत्त्वाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही राजकीय धुरंधर एकाच मंचावर आले होते. या तिन्ही नेत्यांना एकत्र पाहिल्यानंतर लोकांना मोठे आश्चर्य वाटल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "मला या कार्यक्रमाचे आमंत्रण आल्यावर मनात कधीही शंका आली नाही की जावे की नाही. आम्ही एका मंचावर एकत्र आलो आहोत, कारण ही महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा आहे."

राजकारणातील सलोखा आणि संवादाची परंपरा
राजकारणातील कटूता आणि संवादावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "देशाच्या काही भागात किंवा दाक्षिणात्य राजकारणात राजकीय विरोधकांना ‘खून के प्यासे’ (जिवावर उठलेले) पाहण्याची संस्कृती दिसते. परंतु, महाराष्ट्रात तसे नाही. आमचे राजकीय मतभेद नक्कीच आहेत, पण आम्ही एका कार्यक्रमात एकत्र येऊ शकतो, हसू शकतो आणि एकत्र चहाही पिऊ शकतो. हाच महाराष्ट्राच्या राजकारणातील जिवंत संवाद आजही टिकून आहे, जो कौतुकास्पद आहे." त्यांनी विशेषत्वाने राज ठाकरे यांचे आभार मानले, कारण राज ठाकरेंनीच या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी सूचना केली होती.

Shanti real estate 1

व्यंगचित्रकलेचा वारसा आणि स्वतंत्र दालनाची घोषणा
महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेने जगात वेगळाच मान मिळवला असून, सर्वाधिक कला महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनीच जोपासली आहे, असेगौरवोद्गार मुख्यमंत्रмаंनी काढले. ग्रंथाली प्रकाशनाचे कौतुक करताना त्यांनी हे पुस्तक प्रत्येक संग्रहात असावे असे म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या ऐतिहासिक कलाकृती जतन करण्यासाठी एक भव्य व सुसज्ज ‘व्यंगचित्र दालन’ उभारले जाईल, अशी घोषणा करत यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.