२९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रंगणार प्रसिद्ध यात्रा; राजकीय उलथापालथ, पावसाचे संकेत आणि महागाईबाबत फरांडे बाबांचे भाकीत
Kolhapur Pattankodoli Yatra: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव यात्रा २०२६ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी ‘विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने चांगभलं’चा गजर करत दर्शन घेतले आणि पट्टणकोडोली परिसर सोनेरी भंडाऱ्याच्या उधळणीने उजळून निघाला. देश-विदेशातील पर्यटक आणि भाविक या अलौकिक यात्रेचा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात.
२९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान यात्रेचा उत्सव
पट्टणकोडोली येथील ही प्रसिद्ध श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा यंदा २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत मोठ्या आनंदात पार पडत आहे. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची अलोट गर्दी झाली असून, संपूर्ण मंदिर परिसर भंडाऱ्याच्या पिवळ्याधमक रंगात न्हाऊन निघाला आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन व मंदिर प्रशासनाकडून कडक व्यवस्था करण्यात आली आहे.
फरांडे बाबांची बहुप्रतिक्षित भाकणूक जाहीर
पट्टणकोडोली यात्रेचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘फरांडे बाबांची भाकणूक’. वर्षातून एकदा होणाऱ्या या भाकणुकीकडे शेतकरी, भाविक आणि राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेले असतात. यावर्षी देखील फरांडे बाबा यांनी पुढील वर्षाचा ताळेबंद सांगणारी भाकणूक केली असून, ती ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

फरांडे बाबांनी केलेल्या भाकणुकीतील महत्त्वाचे मुद्दे:
पावसाचे संकेत: येत्या पुढच्या सात दिवसांत पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
राजकीय उलथापालथ: देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि राजकीय उलथापालथ होऊन देशावर ‘महिला राज’ येईल, असे भाकीत करण्यात आले आहे.
दरवाढ व महागाई: येत्या काळात मिरची आणि साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
सामाजिक आंदोलने: देशात आणि राज्यात मोठी आंदोलने उभी राहतील तसेच संघर्षाच्या (लढायांच्या) परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, अशी भाकणूक करण्यात आली आहे.













