Devendra Fadnavis: “२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही…”; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी

Devendra Fadnavis: "२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही..."; 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' पुस्तक प्रकाशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी

गचित्रकारांसाठी महाराष्ट्रात विशेष दालन उभे करणार; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मदत घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis: "राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात, असे आशिष शेलार म्हणाले. पण आशिषजी, २०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला, तेव्हा तेव्हा मी आलो. मात्र २०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो… मी तर वाटच पाहत राहिलो," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय टोलेबाजी करत सभागृहात हास्याची कारंजी उडवली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकलेचा १०० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमातील शेवटच्या भाषणाचा फायदा!
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. भाषणादरम्यान मिश्किल टिप्पणी करत मुख्यमंत्री म्हणाले, "या कार्यक्रमात शेवटचे भाषण देण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, यावर आता राज ठाकरे मला कोणतेही उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आज मी काहीही बोललो तरी समोरून प्रतिषटकार मारला जाणार नाही."

"माझं नाक मोठं काढा, पण पोट नाही!"
राजकारण्यांवर निघणाऱ्या व्यंगचित्रांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "परिस्थितीचे अचूक आकलन करण्यासाठी मोठे अग्रलेख लिहिले जातात, मात्र एक उत्तम व्यंगचित्र संपूर्ण परिस्थितीचा थेट सारांश दाखवून देते. आमच्यावर सतत व्यंगचित्रे निघत असतात, पण आपले चित्र पाहून कधीही दुःख वाटत नाही. व्यंगचित्र कसेही काढले तरी ते पाहताना आनंदच होतो." यासोबतच त्यांनी राज ठाकरेंशी झालेला एक मजेशीर किस्सा सांगितला. "मी एकदा राज ठाकरेंना विनंती केली होती की, व्यंगचित्रात माझं नाक मोठं दाखवा, पण माझं पोट मोठं दाखवू नका! आता तर मी माझं पोट कमी केलं आहे, त्यामुळे इतर व्यंगचित्रकार मला याबाबतीत सोडतील अशी आशा आहे," अशी जोड त्यांनी दिली.

Arihant 2

व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारणार
महाराष्ट्रातील कलाकारांच्या आणि व्यंगचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींसाठी एक भव्य व सुसज्ज दालन (आर्ट गॅलरी) उभे करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची मदत आणि मार्गदर्शन घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.