उत्पादक स्थळीच पॅकिंग करणे बंधनकारक; अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर निर्णयामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले
FDA Action on Spices: स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील हळद, तिखट, जिरे, धने आणि गरम मसाले आता सुट्टे खरेदी करताना ग्राहकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मसाल्यांमध्ये लाकडाचा भुसा, कृत्रिम रासायनिक रंग आणि घातक घटकांची मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आता मसाल्यांचे पॅकिंग थेट उत्पादक स्थळीच करणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम भंग करणाऱ्या दोषींना ७ ते ९ वर्षांपर्यंतचा कारावास आणि १० लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
भेसळ रोखण्यासाठी एफडीएची कठोर भूमिका
मसाल्यांना आकर्षक रंग देण्यासाठी कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर, तसेच वजन वाढवण्यासाठी लाकडाचा भुसा व अन्य घटक मिसळण्याचे प्रकार मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकरांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत, यासाठी मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करावे लागणार आहे. किरकोळ दुकानदारांसह घाऊक विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

पॅकिंगवरील माहिती तपासणे गरजेचे
उत्पादक स्थळीच मसाल्यांचे पॅकिंग करून ते योग्य लेबलसह विक्रीसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक, पॅकिंगची तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत यांसारखी माहिती स्पष्टपणे असणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी मसाले खरेदी करताना पॅकिंगवरील ही माहिती तपासावी आणि संशयास्पद किंवा भेसळयुक्त उत्पादनांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या टीमकडून सध्या दुकानांमध्ये कसून तपासणी सुरू असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जात आहेत.













