El Niño heat mortality tracker: सुपर एल निनोमुळे भारतात ५५ हजार मृत्यूची भीती; ‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’चा धक्कादायक इशारा

El Niño heat mortality tracker: सुपर एल निनोमुळे भारतात ५५ हजार मृत्यूची भीती; 'क्लायमेट इम्पॅक्ट लॅब'चा धक्कादायक इशारा

जागतिक पातळीवर एल निनोमुळे ८ लाख ५७ हजार मृत्यूंचा अंदाज; पुढील सहा महिन्यांत भारतात मार्च महिन्यात सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता

El Niño heat mortality tracker या नवीन उपकरणाच्या नुकत्याच समोर आलेल्या अद्ययावत माहितीनुसार जगभरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे आणि तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने विकसित केलेल्या या विशेष ट्रॅकरनुसार, सन २०२६ मधील ‘सुपर एल निनो’मुळे जगभरातील पर्जन्यमानात मोठे बदल होऊन तापमान विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे एकट्या भारतात अंदाजे ५५ हजार लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यातील बहुतांश मृत्यू हे मार्च महिन्यात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर ८.५७ लाख मृत्यूंचा धोका

या ट्रॅकरमध्ये मार्च महिन्यापर्यंतची नवी आकडेवारी समाविष्ट करण्यात आली आहे. अभ्यासानुसार, एल निनोमुळे वाढणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे जगभरात एकूण अंदाजे ८ लाख ५७ हजार लोकांचा बळी जाऊ शकतो. यापैकी सुमारे ३ लाख ७३ हजार मृत्यू हे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत होण्याची दाट शक्यता आहे. एल निनोमुळे होणाऱ्या या प्राणघातक उष्णतेचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या (ऑक्टोबर ते मार्च) ताज्या आकडेवारीनुसार, नायजेरियात सर्वाधिक म्हणजे तब्बल ५६ हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे, तर त्यापाठोपाठ ५५ हजार संभाव्य मृत्यूंसह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Swami swaru. Pat.

जीव वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर

जून महिन्यात एल निनोचा प्रभाव सुरू झाल्यापासून उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंची अचूक आकडेवारी हे साधन पुरवते. जगातील विविध राज्यांकडून माहिती संकलित करून, हे साधन आंतरराष्ट्रीय निधी पुरवठादार आणि कार्यकर्त्यांना सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांची स्पष्ट माहिती देते, ज्यामुळे वेळेवर संसाधने पोहोचवून लोकांचे जीव वाचवणे सोपे होणार आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सह-संस्थापक आणि शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक मायकल ग्रीनस्टोन यांनी सांगितले की, हे संशोधन तीव्र उष्णतेमुळे लोकांना कुठे सर्वाधिक धोका आहे, हे आधीच ओळखून जीवितहानी टळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास मदत करेल.

आग्नेय आशिया मुख्य हॉटस्पॉट

जागतिक पातळीवर आग्नेय आशिया हा भाग उष्णतेचा मुख्य हॉटस्पॉट ठरला आहे. एल निनोच्या उष्णतेच्या लाटेमुळे इंडोनेशियामध्ये अंदाजे २९ हजार मृत्यू होण्याचा अंदाज आहे, तर ब्राझीलमध्येही सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू अपेक्षित आहेत. एल निनोचा प्रभाव पूर्णपणे संपेपर्यंत ही प्रयोगशाळा दरमहा या ट्रॅकरची माहिती अद्ययावत करणार असून, उष्णतेच्या धोक्यांवर सतत लक्ष ठेवणार आहे.