Alphonso mango production : प्रतिकूल हवामानावर मात करत राजापूरमधून मान्सूनपूर्व हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Alphonso mango production : प्रतिकूल हवामानावर मात करत राजापूरमधून मान्सूनपूर्व हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

कोकणातील पहिली हापूस पेटी नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना; राजापूरच्या बागायतदाराची किमया

*राजापूर (रत्नागिरी) *: पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानावर आणि निसर्गाच्या लहरीपणावर मात करत राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथील प्रगतशील आंबा बागायतदार तानाजी तांबे यांनी यंदाच्या हंगामातील हापूसचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या बागेतील फळधारणा टिकवून तयार झालेली सहा डझन आंब्यांची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातील ही पहिलीच हापूस पेटी असून, या पेटीला सुमारे ५१ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळण्याची अपेक्षा बागायतदार तांबे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिकूल हवामानावर मात करत फळधारणा
यंदाच्या पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या हवामानात आंबा पिकासाठी अनेक आव्हाने निर्माण झाली होती. मात्र, योग्य नियोजन आणि योग्य त्या कृषी व्यवस्थापनाच्या बळावर तानाजी तांबे यांनी या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात केली. प्रतिकूल हवामानाचा आंबा पिकाच्या फुलोऱ्यावर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम होत असतानाही, विशेष काळजी घेतल्यामुळे बागेतील फळधारणा टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले.

बारामती ते कोकण असा २५ वर्षांहून अधिकचा प्रवास
मूळचे बारामती येथील असलेले तानाजी तांबे गेल्या २९ वर्षांपासून कोकणात वास्तव्यास आहेत. सुरुवातीला कीटकनाशके आणि कृषी औषध विक्रीचा व्यवसाय करत असताना त्यांनी शेतीतील तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केला. याच अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा घेत त्यांनी चार वर्षांपूर्वी राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथे जमीन खरेदी केली आणि व्यावसायिक आंबा लागवड सुरू केली. त्यांच्या या जिद्दीमुळे आणि परिश्रमामुळे आज कोकणातील हापूसच्या पहिल्या मानाच्या उत्पादनात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

Samarth gold