खेड : भरणे येथील गोळीबार मैदानाजवळ देशी विदेशी मद्य पोलिसांकडून जप्त

खेड : भरणे मार्गावरील गोळीबार मैदानाजवळ पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विदेशी मद्यसाठा व दोन रिक्षा असा सव्वाचार लाखांचा ऐवज शुक्रवारी, दि. ८ रोजी सायंकाळी जप्त केला आहे. विनापरवाना मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी मंदार महादेव उसरे (वय ३५, रा. भडगाव), प्रणित सुनील मोहिते (२६) यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार उसरे हा बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षातून ६ हजार ७९५ रुपये किमतीच्या विदेशी मद्यसाठ्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पथकाने सापळा रचून गस्तीदरम्यान त्याला रंगेहाथ पकडले. विदेशी मद्यसाठ्याची विनापरवाना वाहतूक केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विदेशी मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरलेली दोन लाख रुपये किंमतीची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रणित मोहिते हा रिक्षातून विनापरवाना मद्याची वाहतूक करत होता. पोलिसांच्या गस्तीदरम्यान तो विदेशी मद्यसाठ्यासह रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी शिपाई राहुल कोरे याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील खोपीफाटा येथेही दोन्ही बाजूकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 11/Nov/2024