देवळे येथील दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे रुग्ण रुग्णालयात दाखल
Ratnagiri Nagpur Highway Accident बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील करंजारी येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, देवळे गावचे रहिवासी असलेले सलाउद्दीन हे आपल्या दुचाकीवरून (क्र. MH08 BM 7634) प्रवास करत होते. ते करंजारी परिसरात आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव फोर व्हीलर कारने (क्र. MH08 B 5016) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताचा भीषण आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
Ratnagiri Nagpur Highway Accident: प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवले

स्थानिक ग्रामस्थांनी जखमी सलाउद्दीन यांना तात्काळ उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे प्राथमिक उपचारादरम्यान त्यांना सहा टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, डोक्यातून सतत रक्तस्राव होत असल्याने आणि दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचार व सीटी स्कॅन (CT Scan) करण्यासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या सलाउद्दीन यांची प्रकृती स्थिर असल्याचे एका ग्रामस्थाकडून सांगण्यात आले आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत
या अचानक झालेल्या दुर्घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि मदतीमुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली.













