कवितांचे सादरीकरण आणि फराळाचे वाटप करत साजरी झाली पुण्यतिथी
Keshavsut Memorial Event Malgund बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या महान कार्याला व विचारांना उत्साहात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारकातील कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्याला स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी समारंभ पार पडला. या प्रसंगी कवी केशवसुतांच्या प्रतिमेला कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष आबा पाटील आणि नलिनी खेर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
Keshavsut Memorial Event Malgund: साहित्यिक कार्यक्रम आणि कविता सादरीकरण

कार्यक्रमादरम्यान प्रा. हनमंत कदम यांनी कवी केशवसुतांच्या साहित्यिक वाटचालीचा आणि महान कार्याचा सविस्तर आढावा घेतला. मालगुंड कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये यांनी कवी केशवसुतांची प्रसिद्ध ‘स्फूर्ती’ ही कविता सादर केली. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) दक्षिण कोकण विभागाचे युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनी कवी केशवसुतांच्या जीवनावर आधारित स्वतः रचलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या ‘कवी केशवसुतांची कविता’ व ‘शब्दक्रांतीचा सूर्य केशवसुत’ या दोन सुंदर कविता ऐकवून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप कोमसापच्या साहित्यातील क्रांतीचा जयजयकार करत करण्यात आला.
दिवाळी फराळाने एकमेकांना दिल्या शुभेच्छा
दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या दिवसांत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या औचित्यावर शुभदा मुळ्ये यांनी आणलेले लाडू व चकल्या तसेच उज्ज्वला बापट यांनी आणलेला गोड शिरा हा फराळ उपस्थितांना देऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या अभिवादन कार्यक्रमास कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आबा पाटील, कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, कार्याध्यक्षा शुभदा मुळे, रामानंद लिमये, प्रा. हनमंत कदम, उज्ज्वला बापट, डॉ. मोरेश्वर मुळे यांच्यासह इतर मान्यवर, स्मारकाचे कर्मचारी आणि परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













