सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मार्लेश्वर देवस्थान परिसरातील घनदाट वनराईत भारतीय विशाल खार आढळल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
Marleshwar Shekru Sighting: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मार्लेश्वर देवस्थान परिसरातील घनदाट जंगलात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला दुर्मिळ ‘शेकरू’ (भारतीय विशाल खार) आढळून आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या परिसरात शेकरूचा वावर दिसून आल्याने येथील समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीवांसाठी पोषक असलेला नैसर्गिक अधिवास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या दुर्मिळ दर्शनामुळे कोकणातील वन्यजीव आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
निसर्गरम्य डोंगररांगा, बारमाही वाहणारे धबधबे आणि घनदाट वनराईमुळे मार्लेश्वर परिसर हा धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र मानला जातो. अशा या निसर्गसंपन्न जंगलात शेकरूचे अस्तित्व आढळणे हे येथील पर्यावरण संतुलित आणि वन्यजीवांसाठी अत्यंत अनुकूल असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
आकाराने मोठा, आकर्षक तांबूस-तपकिरी रंगछटा असलेला आणि लांब, दाट झुबकेदार शेपटी हे शेकरूचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा प्राणी प्रामुख्याने जमिनीवर न येता उंच झाडांच्या शेंड्यांवर वास्तव्य करणे पसंत करतो. एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर लीलया लांब उड्या मारण्याची त्याची अद्भूत क्षमता आणि चपळता निसर्ग अभ्यासकांचे व पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

उंच वृक्षांवर पालापाचोळा आणि काटक्यांच्या साहाय्याने गोल आकाराची मोठी घरटी बांधून राहणारा शेकरू प्रामुख्याने फळे, विविध बिया, फुले आणि कोवळी पाने यांवर आपला उदरनिर्वाह करतो. जंगलातील बियांचा नैसर्गिकरीत्या प्रसार करून वनीकरणास मदत करणे आणि जंगलातील अन्नसाखळीचा समतोल राखण्यात शेकरूची भूमिका अत्यंत मोलाची मानली जाते.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या या भागात राज्य प्राण्याचे दर्शन घडल्याने या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढले आहे. मार्लेश्वरच्या या समृद्ध वनक्षेत्राचे संवर्धन आणि येथील जैवविविधतेची सुरक्षा भविष्यात अधिक बळकट करण्याची आवश्यकता निसर्ग अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.













