आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली कोंडगाव साखरपा परिसरात मतदान जागृती

देवरुख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे कोंडगाव व साखरपा परिसरात मतदान व इतर महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली.

कोंडगाव बाजारपेठ आणि साखरपा व कोंडगाव येथील गर्दीच्या निवासी वस्तीच्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांद्वारे आणि स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे असणारे महत्त्व याप्रसंगी विशद केले.

मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे चार गट पाडून मतदानाचे महत्त्व व मतदारांची जबाबदारी, आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, जलसंचय व संवर्धन, ऊर्जा बचत, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनाधीनतेचे तोटे या विषयावर जनजागृती करून स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले. सध्या कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर कोंडगाव, साखरपा परिसरात असल्याने विद्यार्थ्यांनी हे समाजप्रबोधनाचे उपयुक्त काम केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील सहभागी ५० विद्यार्थी स्वयंसेवकांचे नेतृत्व अभिषेक आगरे, मनीष रेवाळे, अन्वी प्रसादे व शुभ्रा जोयशी या स्वयंसेवक प्रतिनिधींनी केले. या विद्यार्थ्यांच्या रॅलीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे आणि प्रा. मयुरेश राणे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या रॅलीला श्रीधर कबनूरकर (अध्यक्ष व्यापारी संघटना, कोंडगाव), ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 11/Nov/2024