पर्यटकांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या नियोजनाचा वाहनचालकांना मोठा फटका; स्थानिक रहिवासी, नोकरदार आणि रिक्षा व्यावसायिक हैराण
Ratnagiri CNG shortage मुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सण साजरा केल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मात्र, या वाढत्या गर्दीच्या तुलनेत गॅसचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, चारचाकी आणि रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांमध्ये सीएनजी पंपांवर सध्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, एमआयडीसी जे.के. फाईल्स, हातखंबा, नाचणे यांसह चिपळूण, खेड (येथे एमजीएल), लांजा आणि पाली येथील विविध सीएनजी पंपांवर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. अनेक पंपांवर ‘सीएनजी संपले’ असे फलक लावले जात असल्याने तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या चालकांचा हिरमोड होत असून, तरीही अनेक वाहनचालक रिफिलिंगच्या गाड्या येईपर्यंत पंपावरच थांबून राहत आहेत.
पर्यटन हंगामात नियोजनाचा अभाव; रिक्षा व्यावसायिकांना फटका
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि गणपतीपुळे यांसारख्या विविध समुद्रकिनारी पर्यटकांनी चारचाकी व मिनीबसच्या माध्यमातून मोठी गर्दी केली आहे. सणासुदीच्या आणि पर्यटनाच्या हंगामात सीएनजीची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पंप चालकांनी वेळीच योग्य नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन हंगामात गॅस भरण्यासाठी एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लावाव्या लागत असल्याने स्थानिक रहिवासी, नोकरदार, चाकरमानी आणि पर्यटक चांगलेच हैराण झाले आहेत.
चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि दापोली या भागांतील स्थानिक रिक्षाचालकांनाही या टंचाईचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने रिक्षा व्यावसायिकांना प्रवासी वाहतुकीऐवजी जास्त वेळ पंपावरील रांगेतच घालवावा लागत आहे.
वाहनचालकांकडून तीव्र नाराजी
पंपचालकांकडून पूर्वीच सीएनजी गॅसचा मुबलक साठा ठेवणे अपेक्षित असताना तसे नियोजन न झाल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या समस्येबाबत बोलताना चारचाकी चालक किरण राठोड यांनी सांगितले की, शाळा-महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत, मात्र पंपांवर कधी गॅस सुरू असतो तर कधी बंद असतो. सीएनजी भरण्यासाठी तब्बल दोन तासांनंतर नंबर येत असल्याने वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, पंपचालकांनी यावर तातडीने योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे.














