Ratnagiri ST buses: कार्तिकी वारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून १६६ ‘लालपरी’ पंढरपूरला रवाना; १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने धावणार बसेस

Ratnagiri ST Bus News: रत्नागिरी विभागात लवकरच १५० स्मार्ट बसेस दाखल होणार!

लांजा, राजापूर, चिपळूण, दापोलीसह विविध आगारांतून जादा बसेसचे नियोजन; महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलतीचा लाभ

Ratnagiri ST buses च्या माध्यमातून कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या कोकणातील वारकरी आणि भाविकांसाठी रत्नागिरी एसटी विभागाने तब्बल १६६ जादा बसेसचे नियोजन केले आहे. येत्या मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, त्यानिमित्ताने १४ नोव्हेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून ‘लालपरी’ पंढरपूरच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत या जादा बसेस टप्प्याटप्प्याने धावणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आषाढी वारीनंतर कार्तिकी वारीला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असते, त्यामुळे राज्यभरातून लाखो भाविक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. कोकणातील वारकरी आणि भाविकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी रत्नागिरी विभागाने जादा गाड्यांचे आरक्षण सुरू केले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील १६६ एसटी बसेसचे पूर्ण बुकिंग झाले असून, मागील वर्षी रत्नागिरी विभागातून १६२ एसटी गाड्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या होत्या.

जिल्ह्यातील ‘या’ आगारांतून सुटणार जादा बसेस

रत्नागिरी विभागातील विविध तालुक्यांमधून या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून, अनेक भाविकांनी ग्रुप बुकिंगलाही पसंती दिली आहे. यामध्ये खालील आगारांचा समावेश आहे:

  • रत्नागिरी आणि लांजा आगार
  • राजापूर आणि देवरूख आगार
  • चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली आगार

याव्यतिरिक्त लांजा, दापोली, रत्नागिरीसह इतर तालुक्यांतील काही वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जात आहेत, तर काही भाविक खाजगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी रवाना होत आहेत. एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर परतीच्या प्रवासाने या सर्व एसटी बसेस पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात परततील.

Hotel star caters

महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यंदाही शासनाच्या नियमांनुसार महिला आणि ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात आहे, तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

या नियोजनाबाबत माहिती देताना रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी सांगितले की, कार्तिकी वारीसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी १६६ बसेस सोडण्यात येत आहेत आणि या उपक्रमाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विठ्ठलनामाचा गजर करत कोकणातील भाविक आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.