पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती झालेल्या शिक्षकांना मिळाली संधी; सेवाज्येष्ठता व वेतनावर कोणताही परिणाम होणार नाही
Ratnagiri teacher transfer च्या प्रक्रियेत रत्नागिरी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या ६५ शिक्षकांना अखेर स्वगृही जाण्याची मोठी संधी मिळाली आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून या शिक्षकांची बदली त्यांच्या मूळ जिल्ह्यांत करण्यात आली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
‘पवित्र पोर्टल’ ही शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाची केंद्रीकृत प्रणाली आहे. या पोर्टलद्वारे काही वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती करण्यात आली होती. गुणवत्ता यादी आणि प्राधान्यक्रमानुसार अनेक शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यापासून दूर कोकणात नियुक्ती मिळाली होती. त्यानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधील शिक्षकांना रत्नागिरीत सेवा बजावावी लागत होती. गेल्या तीन ते पाच वर्षांपासून हे शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये अविरत सेवा देत होते.
विशेष सवलतीमुळे शिक्षकांनासा मिळाला लाभ
मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी या शिक्षकांकडून आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यात आले होते. शासनाने पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली होती. या विशेष तरतुदीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ शिक्षकांनी पसंतीच्या जिल्ह्यांमध्ये बदली मिळवली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने या सर्व शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, या बदलीमुळे शिक्षकांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा कालावधीत कोणताही खंड पडणार नाही. त्यामुळे त्यांची सेवा ज्येष्ठता, वेतनवाढ, पदोन्नती आणि निवृत्ती लाभांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.














