संगमेश्वरमधील ‘हाफ मर्डर’ प्रकरणात १० वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर!

संगमेश्वरमधील 'हाफ मर्डर' प्रकरणात १० वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर!

आसावे ब्राह्मणवाडी येथील वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावली होती शिक्षा; ॲड. अभिजीत कदम यांचा प्रभावी युक्तिवाद

रत्नागिरी :
संगमेश्वर तालुक्यातील मौजे आसावे ब्राह्मणवाडी येथील एका वृद्ध महिलेचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या (हाफ मर्डर) गुन्ह्यात रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या आरोपीस उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी विनोद भिकू मुदगल याला जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत.

पीठ दळणाच्या पैशांच्या वादातून झाला होता प्राणघातक हल्ला :
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आसावे ब्राह्मणवाडी (ता. संगमेश्वर) येथील एक वृद्ध महिला आपल्या घरी घरघंटी चालवून उदरनिर्वाह करत होत्या. काही वर्षांपूर्वी पीठ दळणाचे पैसे जास्त घेतल्यावरून त्यांचा आरोपी विनोद भिकू मुदगल (रा. आसावे) याच्याशी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दिनांक १४ मे २०२२ रोजी सदर वृद्ध महिला घरी एकटी असताना आरोपी विनोद मुदगल याने घराच्या पुढील बाजूस असलेल्या बाथरूमजवळ येऊन त्यांचा गळा दाबला व नखे खुपसून त्यांना बेशुद्ध केले आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून भारतीय दंड विधान कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

सत्र न्यायालयाने सुनावली होती १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा :
या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन रत्नागिरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. न्यायालयासमोर सरकारी पक्षामार्फत एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले होते. सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आरोपी विनोद भिकू मुदगल याला दोषी ठरवत १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Kokan grahak peth

उच्च न्यायालयात अपील; ॲड. अभिजीत कदम यांच्या युक्तिवादानंतर जामीन मंजूर :
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात आरोपी विनोद मुदगल याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर फौजदारी अपील (क्र. ४०/२०२६) दाखल करत जामिनाची मागणी केली होती. या अपिलावर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. श्री. अभिजीत कदम यांनी न्यायालयासमोर प्रभावी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी विनोद मुदगल यास सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.