तपासात ५० ते ७० सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल्सची मदत; तपास पथकाला पोलीस अधीक्षकांकडून ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर
Chiplun Murder Case मधील आरोपीचा शोध घेण्यात चिपळूण पोलीस आणि रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या पाच दिवसांत यश आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील वालोपे परिसरात १६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या हत्या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सराईत गुन्हेगार पवन आंबेडे याला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडून तपास पथकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
१६ नोव्हेंबर रोजी वालोपे परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती डायल ११२ द्वारे चिपळूण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका पानटपरीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, तर घटनास्थळी रक्ताने माखलेला जांभा दगड पडलेला होता. या दगडाने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. सुरुवातीला मृताची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते; मात्र तपासात मृत तरुण नवनाथ बबन कांबळे (वय ३१, मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असल्याचे स्पष्ट झाले. तो चिपळूणमध्ये आपल्या मामाकडे वास्तव्यास होता.
Chiplun Murder Case: सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्समुळे तपासाची दिशा निश्चित
घटनास्थळी आरोपीचा माग काढण्यासाठी कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसल्याने तपासाची दिशा ठरवणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित करत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली.

रेल्वे स्थानक परिसरापासून ते महामार्गापर्यंतच्या सुमारे ५० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. यासोबतच ३० ते ४० संशयितांचे कॉल डिटेल्स मागवून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या सलग तपासातून संशयिताची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश आले.
कोल्हापुरात सापळा रचून आरोपीला केले जेरबंद
चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने सूत्रे हलवली. सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथील पवन आंबेडे याच्यावर संशय बळावल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला आणि कोल्हापुरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, आर्थिक व्यवहारांचा संबंध आणि या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत उपनिरीक्षक आगाव, राजेश यादव, विकास निकम यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.













