मासेबाव येथील हॉटेलमधील घटना; लोखंडी सळी व बांबूने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
Ratnagiri Crime News समोर आली असून, रत्नागिरी तालुक्यातील मासेबाव येथील सिद्धिविनायक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपला भाऊ आणि हॉटेलचा मालक असलेल्या व्यक्तीला कामगाराने धमकी दिल्याच्या गैरसमजातून ही मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी राजू यशवंत रामगडे (रा. करबुडे, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी जखमी कामगार निलेश गणपत रावणांग (वय ३७, रा. उक्षी बनाचीवाडी वरचीवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी निलेश रावणांग हे मासेबाव येथील दीपक रामगडे यांच्या मालकीच्या सिद्धिविनायक हॉटेलमध्ये काम करत होते. कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी ते हॉटेल मालक दीपक रामगडे यांचा भाऊ राजू रामगडे याच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले होते.
Ratnagiri Crime News: गैरसमजातून लाकडी बांबू व लोखंडी सळीने हल्ला
सुट्टीची विचारणा करत असतानाच, कामगार निलेश रावणांग याने आपला भाऊ व हॉटेलचा मालक दीपक रामगडे याला धमकी दिली असल्याचा गैरसमज राजू रामगडे याने करून घेतला. या गैरसमजातून संतापलेल्या राजूने फिर्यादी निलेश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर लाकडी बांबूने निलेश यांच्या पाठीवर मारहाण केली तसेच लोखंडी सळी डोक्यात मारून त्यांना दुखापत केली. या मारहाणीत कामगार जखमी झाला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी
मारहाण केल्यानंतर संशयित राजू रामगडे याने कामगाराला धमकावले. "तू पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिलीस तर तुला ठार मारेन," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमी कामगार निलेश रावणांग यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.













