काळकाईकोंड येथील एकाचा जागीच मृत्यू, दापोली पोलिसांत तक्रार दाखल
Dapoli Accident News समोर आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील खेर्डी-कातळवाडी येथे मंडणगडहून दापोलीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेंद्र शांताराम गोरीवले (वय ४५, रा. काळकाईकोंड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात आणखी एका दुचाकीचेही नुकसान झाले असून, संबंधित दुचाकीस्वाराला दुखापत झाली आहे.
जालगाव येथील श्रद्धा ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावर रात्रपाळीचे काम संपवून दुचाकीने घरी जात असलेले ओमकार नितीन कालेकर (वय २८, रा. करंजाणी, उगवतवाडी) हे या घटनेचे साक्षीदार आणि तक्रारदार आहेत. ते खेर्डी-कातळवाडी येथे आले असता त्यांच्या पुढे असलेल्या दुचाकीवरील सुरेंद्र गोरीवले यांना मागून येणाऱ्या एसटी बसने ओव्हरटेक केले.
Dapoli Accident News: ओव्हरटेक आणि समोरून आलेल्या बसमुळे दुचाकी घसरली
पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसच्या त्याच वेळी समोरून दुसरी एसटी बस आल्याने दुचाकीच्या चालकाने ब्रेक लावला. ब्रेक लागताच दुचाकी घसरून रस्त्यावर पडली आणि याच दरम्यान मंडणगड-दापोली एसटी बसची त्या दुचाकीला धडक बसली.

धडकेनंतर दुचाकी बसच्या खाली गेली आणि सुरेंद्र गोरीवले हे बसच्या खालच्या भागात अडकले. या भीषण धडकेत गोरीवले यांच्या डोक्याला, कमरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद
या अपघाताप्रकरणी दुचाकीस्वार ओमकार कालेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंडणगड एसटी आगारातील बसचालक भारत नाथा भवार (वय ४७) यांनी बस वेगात व रस्त्याच्या मध्यभागातून धोकादायक पद्धतीने चालविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दुचाकीस्वाराच्या मृत्यूसह दुसऱ्या दुचाकीचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, दापोली पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.













