Marleshwar Temple News: मार्लेश्वर मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यात दगड कोसळले; आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या पाहणीदरम्यान घडला प्रकार

सुदैवाने जीवितहानी नाही; खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ दर्शन थांबवले, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marleshwar Temple News समोर आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या मार्लेश्वर मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यात अचानक छोटे दगड कोसळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) चे तज्ज्ञ मंदिराची पाहणी करत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने त्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ भाविकांचे दर्शन थांबवण्यात आले होते. या घटनेनंतर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन सखोल पाहणी केली.

Marleshwar Temple News: धबधब्याजवळील दुर्घटनेनंतर गाभाऱ्यात दगड कोसळण्याचा प्रकार
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मार्लेश्वर धबधब्याजवळ डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथील एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरील दगड सैल होऊन अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

Shoping fiesta

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तज्ज्ञांच्या अहवालाकडे लक्ष
आता थेट मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यातच छोटे दगड कोसळल्याने मार्लेश्वर परिसरातील भाविकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या पाहणी अहवालातून नेमके काय निष्पन्न होते आणि या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.