NTA Exam Reforms: राष्ट्रीय परीक्षा सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी राज्याचा सहभाग वाढवणार; नंदन निलेकणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

NTA Exam Reforms: राष्ट्रीय परीक्षा सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी राज्याचा सहभाग वाढवणार; नंदन निलेकणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

NTA Exam Reforms संदर्भात ‘वर्षा’ निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक; परीक्षा केंद्रे, मनुष्यबळ प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांवर सविस्तर विचारविनिमय

मुंबई: NTA Exam Reforms आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक व सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. मुंबईतील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा तसेच राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा आणि समन्वयावर भर
राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (एनटीए) आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि परीक्षा आयोजनासाठी लागणारे लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सखोल चर्चा झाली. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक असून, त्यासाठी शासकीय यंत्रणा व पायाभूत सुविधांचा वापर करण्यावर विचारविनिमय करण्यात आला.

समान संधी, सुलभता आणि पारदर्शकता
परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, तसेच इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता टिकवून ठेवताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अधिक संधी देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

Shanti2

पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पावले
गेल्या काही महिन्यांत देशात वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट (NEET) परीक्षा आणि इतर परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. राज्यातही नीट, सीईटी (CET), टीईटी (TET) तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटनांनंतर विद्यार्थी आणि पालकांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर शासनाने आंदोलकांशी चर्चा करून उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता परीक्षा अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यात अधिक समन्वय साधून विद्यार्थीकेंद्रित परीक्षा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने ही चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.