सत्र न्यायालयाने ठोठावली होती १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर निर्णय
Sangameshwar Attempt Murder Bail प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथील ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. विनोद भिकू मुदगल (वय ३८, रा. आसावे कुणबीवाडी, ता. संगमेश्वर) असे या आरोपीचे नाव असून, यापूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.
गुन्ह्यातील नोंदीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथील रहिवासी साधना सुधाकर मुळ्ये (वय ५५) आणि आरोपी विनोद मुदगल यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. १४ मे २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साधना मुळ्ये घरी एकट्याच असताना आरोपी विनोद त्यांच्या घरी आला आणि त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला.
मुळ्ये यांनी त्याला तू इथे का आलास आणि तुझे इथे काय काम आहे, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने विनोद याने अचानक मुळ्ये यांची मान आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. जोराने गळा आवळल्याने तक्रारदार महिलेच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि त्या जागीच बेशुद्ध होऊन पडल्या. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्यांचा गळा दुखत होता, तसेच मानेवर गळा आवळल्याच्या खुणा व नखांनी ओरबडल्याचे दिसून आले.

Sangameshwar Attempt Murder Bail: सत्र न्यायालयाची शिक्षा ते उच्च न्यायालयात दाद
या घटनेनंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विनोद मुदगल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास केला होता. या खटल्यात रत्नागिरी सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
सत्र न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात विनोद मुदगल याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वतीने ॲड. अभिजीत कदम यांनी बाजू मांडली. युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.













