पूर येथे मंगळवारी दुपारी अपघात; ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने अडकलेल्या चालकाला बाहेर काढले
Bolero Accident Sangameshwar तालुक्यातील ताम्हाने येथून मलकापूरच्या दिशेने गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (एमएच १० बीआर ४९६९) पूर येथे पलटी होऊन मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडलेल्या या अपघातात चालकासह दोन बैल जखमी झाले आहेत.
पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील तेजस सातपुते हा वाहनात बैल भरून ताम्हानेहून मलकापूरकडे निघाला होता. पूर परिसरात पोहोचल्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो पलटी झाली आणि अपघातानंतर तेजस गाडीतच अडकून मदतीसाठी आरडाओरड करू लागला.
याच वेळी मार्गावरून जाणारे किरदाडी येथील रवी पेडणेकर यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती देवरुख पोलिसांना दिली तसेच अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सातपुतेच्या एका सहकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Bolero Accident Sangameshwar: बचावकार्य, उपचार आणि पुढील प्रक्रिया
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजीत वेलवणकर आणि सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. रवी पेडणेकर, राकेश वेल्ये, झेपले, देवा भाटे तसेच पूर व ताम्हाने येथील ग्रामस्थ आणि तरुणांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या तेजस सातपुतेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतर क्रेनच्या मदतीने पलटी झालेली बोलेरो बाजूला करण्यात आली. या अपघातात तेजसच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर जखमी झालेल्या दोन बैलांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.













