७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात दादाजी भुसे आणि शंभूराज देसाई यांच्याकडेही महत्त्वाच्या विभागांचे कामकाज; मुख्यमंत्री महोदयांची प्रस्तावाला मान्यता
रत्नागिरी :
सोमवार, दिनांक ७ डिसेंबर २०२६ पासून नागपूर येथील विधानभवनात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे[. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील महत्त्वाच्या अशा ‘नगरविकास’ (Urban Development) विभागाचे दोन्ही सभागृहातील विधिमंडळ कामकाज हाताळण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपवली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या माननीय अध्यक्षांना अधिकृत पत्र पाठवले असून या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली आहे.
विधिमंडळ कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे कार्यभार असलेल्या विभागांच्या राज्यमंत्र्यांकडे अनेक विभागांचा कार्यभार असून ते दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या गटांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्यमंत्र्यांकडील इतर विभागांच्या विधिमंडळ कामकाजासोबतच उपमुख्यमंत्र्यांकडील विभागांचे दोन्ही सभागृहातील कामकाज सुरळीतपणे हाताळण्याच्या दृष्टीने तीन कॅबिनेट मंत्र्यांकडे आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून अतिरिक्त विभागांचे विधिमंडळ कामकाज सोपवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
उदय सामंत यांच्यासह तीन मंत्र्यांवर विविध विभागांची जबाबदारी :
या प्रस्तावानुसार, उद्योगमंत्री उदय सामंत हे आपल्या मूळ विभागासोबतच अत्यंत महत्त्वाच्या ‘नगरविकास’ विभागाचे विधिमंडळातील कामकाज पाहणार आहेत. त्यांच्यासोबतच मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे ‘सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)’ आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ‘गृहनिर्माण’ विभागाचे विधिमंडळ कामकाज हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्र्यांशी समन्वय ठेवून एकत्रितरीत्या दोन्ही सभागृहातील कामकाज हाताळतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.














