Delimitation Bill 2026: संसदेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार; आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेची शक्यता

Delimitation Bill 2026: संसदेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार; आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेची शक्यता

Delimitation Bill 2026 आणि महिला आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष; ३ डिसेंबरपर्यंत संसदेचे कामकाज चालण्याची शक्यता

नवी दिल्ली : Delimitation Bill 2026 (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक २०२६) आणि संसदेच्या आगामी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार, ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि बुधवार, २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज बोलावण्याची विनंती दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली की, कामकाजाच्या गरजांनुसार ३ डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांची कार्यवाही समाप्त होऊ शकते. ऑगस्टपासून तहकूब असलेल्या पावसाळी अधिवेशनाचाच हा विस्तारित टप्पा मानला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आज, शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची (Union Cabinet) महत्त्वाची बैठक होणार आहे. या आठवड्यातील ही दुसरी मंत्रिमंडळ बैठक असून, या बैठकीच्या अजेंड्यावर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा विषय असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Delimitation Bill 2026: कॅबिनेट बैठकीचा अजेंडा आणि सत्ताधारी-विरोधकांमधील भूमिका
आगामी सत्रात सरकारकडून काही महत्त्वाचे विधायी आणि शासकीय कामकाज पूर्ण केले जाण्याची शक्यता असली, तरी या सत्रात नेमकी कोणती विधेयके किंवा प्रस्ताव मांडले जातील, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. या घडामोडींमधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

Arihant 2

महिला आरक्षणाची अट: लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवणे तसेच त्यांच्या सीमा पुन्हा निश्चित करणे, ही २०२३ च्या कायद्यानुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक अट मानली जात आहे; त्यामुळे उद्याच्या कॅबिनेट बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर खलबतं होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार: संविधान दिनानिमित्त झालेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संकल्प असल्याचे सांगितले आणि कोणीही या प्रक्रियेला रोखू शकत नाही, असे ठणकावले.

विरोधी पक्षांची भूमिका आणि आरोप: दुसरीकडे, काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाचा कायदा २०२३ मध्येच मंजूर झाल्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेची वाट न पाहता विद्यमान रचनेतच तो लागू करण्याची भूमिका घेतली असून, राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.