संसदीय रणनीतीवर चर्चा होणार; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांचीही मुंबईत बैठक
India alliance meeting उद्या बोलावण्यात आली असून, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर ३ डिसेंबर रोजी राज्यसभेचे विशेष अधिवेशन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर होत असलेल्या या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आजारी असल्याने सुप्रिया सुळे या बैठकीला येणार नसून, त्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनासाठी थेट रविवारी रात्री दिल्लीत पोहोचतील, तर पक्षाचे इतर खासदार बैठकीत सहभागी होतील.
संजय राऊत यांची अनुपस्थिती आणि राजकीय उत्सुकता
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार, ते देखील उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, मात्र त्यांच्या पक्षाच्या वतीने इतर खासदार बैठकीत भाग घेतील. दोन प्रमुख पक्षांचे दोन महत्त्वाचे नेते या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याने दिल्लीतील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या बैठकीतील निर्णय आणि रणनीती
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज काँग्रेसची बैठक पार पडली असून, या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी उपस्थित होते. याच बैठकीत इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, द्रमुकलाही या बैठकीचे निमंत्रण पाठवले जाणार असल्याचे समजते. संसदेतील कामकाजासाठी संयुक्त रणनीती आखणे आणि सभागृहातील भूमिकेवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

शिवसेना खासदारांची बैठक आणि व्हीप जारी
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील नंदनवन बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार असून, संसदीय कामकाज व पक्षाच्या भूमिकेवर चर्चा होईल. याशिवाय शिवसेना खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून, लोकसभेच्या विशेष सत्रासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे निर्देश सर्व खासदारांना देण्यात आले आहेत.













