◼️ संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला उपस्थित राहता आले. चवदार तळ्यासाठी निधी देण्याचे कर्तव्य मला पार पाडता आले. थिबा राजाकालीन बुध्द विहार आणि मंगळवारी पाली येथील दीक्षाभूमीवरील होणाऱ्या भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री म्हणून मला करता आले, आंबवडे गावी बाबासाहेबांच्या जयंती दिनी शासकीय कार्यक्रम करता आला, हे मी माझे भाग्य समजतो, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना २०२४-२५ नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पाली येथील दीक्षाभूमीवर समाज मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे कोनशिला अनावरण करुन भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच विठ्ठलशेठ सावंत, राहूल पंडित, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्रकाश पवार, रामभाऊ गराटे, एन. जी. मोहिते, उपसरपंच सचिन धाडवे, अनिरुध्द कांबळे, उप वनसरंक्षक गिरिजा देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, या भवनासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी दिला आहे. खूप वर्षांपासूनचे हे स्वप्न आज पूर्णात्वास जातेय, याचं मला समाधान आहे. लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मला पहायला मिळाले, हे मी अभिमानाने सांगतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारमुळे हे स्मारक झाले आहे. देशातले पहिले ध्यान मंदिर रत्नागिरीत पूर्णत्वास येत आहे. या मंदिरावर ४० फूट भगवान गौतम बुध्दांची मूर्ती असणार आहे. पाली येथे महिलांसाठी वातानुकुलित सभागृह होत आहे. ओणीला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. विकासाला चालना देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. गावात एकादा प्रकल्प येत असेल तर, सकारात्मक निर्णय घ्या. यासाठी खास करुन मी महिला भगिनिंना पुढे येण्याची विनंती करतो. गावाचा कायापालट करा. पाली ग्रामपंचायतीला ७५ लाख रुपये देऊन नव्याने इमारत बांधली जाईल. पण, नव्या इमारतीत गोल गोल खुर्चीवर बसून लोकांना फिरवू नका, असेही ते म्हणाले.
वाघाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या इंदिरा शांताराम धाडवे या महिलेला नुकसान भरपाई म्हणून ५ लाखांचा धनादेश वन विभागाकडून देण्यात आला.
निवृत्त नायब तहसिलदार एम बी कांबळे यांनी प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. रामभाऊ गराटे, अनिरुध्द कांबळे, संतोष सांवत-देसाई आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, भगवान बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर बुध्द वंदना झाली. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने करण्यात आली. या कार्यक्रमास उपासक, उपासिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 25-09-2024