◼️ वर्षा सामंत यांच्या भेटीगाठीने मतदारसंघातील महिला वर्गात उत्साह
रत्नागिरी : मागील पंधरा वर्ष फक्त भावनिकतेला हात घातला गेला आहे. लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात महिला, तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल असे कोणतेही काम झालेले नाही. महायुतीने मागील अडीच वर्षात अनेक योजना महिलांसाठी आणल्या आहेत. भविष्यात महिलांनाही रोजगारक्षम बनवायचे असेल तर किरण सामंत यांच्याशिवाय मतदारसंघाला पर्याय नाही. या मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी किरण ऊर्फ भैया सामंत यांच्यासाठी धनुष्यबाण लक्षात ठेवा. विकासाचा धनुष्य आता उचलायचा असल्याचे आवाहन वर्षा किरण सामंत यांनी महिला वर्गाला केले आहे.
महायुती शिवसेनेचे उमेदवार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या सौभाग्यवती वर्षा सामंत या प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. किरण सामंत यांच्यासोबतच स्वत:ही अनेक महिलांना त्यांनी रोजगारासाठी सातत्याने पाठबळ दिले आहे. पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांनी आता रोजगारक्षम व्हायला हवे यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. वर्षा सामंत यानी अंजणारी, खानू मठ, नाणीज, करंजारी, देवळे, दाभोळे या गावांना भेटी देत महिला मंडळ व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या बैठकांनाही महिला वगार्र्कडून मोठी गर्दी होत असून, किरण सामंत यांच्या पाठीशी असल्याचे अभिवचन त्यांनी वर्षा सामंत यांना दिले आहे.
या मतदारसंघातील प्रत्येक गावात, शिवसेनेच्या शाखेत अगदी वाडीवस्तीवर जाऊन महिलांशी चर्चा करीत, त्यांच्या व्यथा त्या जाणून घेत आहेत. शासकीय योजनांची माहिती देतानाच त्या महिलांपर्यंत पोहोचतात की नाही याबाबत माहिती घेत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून यापुढे उद्योग धंद्याबाबत काही अडीअडचणी आल्या तर आपण सहकार्य करू, असे आश्वासन महिलांना दिले आहे. किरण सामंत यांनी केलेल्या कामांची माहिती घराघरांत पोहोचवा, प्रचारात कुठेही कमी पडू नका, येत्या 20 तारखेला होणार्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी किरण सामंत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
किरण ऊर्फ भैया सामंत यांची कन्या अपूर्वा काही महिन्यांपासून सातत्याने मतदारसंघात भेटीगाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. आता किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा सामंत यांच्या भेटीगाठीला महिला वर्गांकडून प्रतिसाद मिळत असून, यापुढे विकासासाठी फक्त किरण सामंतच असा नारा मतदारसंघात घुमू लागला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 13-11-2024














