खेड : बसमध्ये विसरलेली वृद्धेची बॅग पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाली

खेड : मुंबईतून एक वृद्ध महिला सोमवारी पेन्शनच्या कामासाठी दापोलीहून खेडकडे एसटीने येत असताना रोख रक्कम असलेली बॅग बसमध्येच विसरली. याबाबत वृद्ध महिलेने येथील पोलिसांत कळवताच पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तप्तरता दाखवत बॅग तिच्याकडे सुपूर्द केली.

मुंबई येथे वास्तव्यात असलेली ही महिला पेन्शनच्या कामासाठी दापोलीत आली होती. तेथील कामे आटपून पुन्हा मुंबईला जाण्यासाठी दापोली-खेड बसमधून प्रवास करत होती; मात्र इच्छितस्थळी उतरल्यानंतर रोख रक्कम व अत्यावश्यक कागदपत्रे असलेली बॅग बसमध्येच राहिल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी तातडीने एसटी बसचालक जयसिंग शिंदे आणि वाहक सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनी बसची तपासणी केली असता ही बॅग बसमध्ये आढळून आली. ती त्यांनी स्वतःहून खेड पोलिसांत आणून दिली. त्यानंतर उपनिरीक्षक येवले, कॉन्स्टेबल पवार यांनी वृद्ध महिलेकडे ही बॅग सुपूर्द केली. याप्रकरणी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 13/Nov/2024