राजापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पिछाडीवर असलेले औद्योगिक क्षेत्र महायुतीचे शासन आल्यानंतर पहिल्या क्रमांकावर आले. आमच्या महायुतीच्या शासनाने अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रगती विरुद्ध विकासाला विरोध, अशी असून कोकणातील जनता महायुतीच्या बाजूने आपला कौल देईल आणि राजापूर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना विजयी करून आमदार म्हणून विधानसभेवर पाठवील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे उपाध्यक्ष भंडारी राजापुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ता काळात राज्यात अपेक्षित विकास झाला नाही. गुंतवणूक वाढली नाही. गुंतवणुकदारांनी काढता पाय घेतला होता. परिणामी, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. विकासकामांना विरोध झाला होता. त्यानंतर महायुतीचे शासन आले आणि मागील सव्वादोन वर्षांत विकासाची घोडदौड सुरू झाली. आमच्या शासनाने अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या, यशस्वीपणे राबविल्या. औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर पडलेला महाराष्ट्र पुन्हा एक नंबरवर आला. राज्यात थेट गुंतवणूक वाढली. निवडणूक प्रगती की विकासाला विरोध, अशी बनली असून, राज्यातील सूझ जनता महायुतीला जोरदार समर्थन देईल आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे शासन विराजमान होईल.
राजापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीविषयी बोलताना त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांत सक्षम नेतृत्व नसल्याने हा मतदारसंघ मागास राहिला; मात्र ती कसर भरून काढण्यासाठी महायुतीतर्फे विकासाला चालना देईल, असा उमेदवार किरण सामंत यांच्या रूपात देण्यात आला आहे. येथील मतदार किरण सामंत यांना विजयी करून विधानसभेत पाठवतील असा विश्वास माधव भंडारी यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 13/Nov/2024














