Ratnagiri : मिऱ्या बंधाऱ्याचे रखडलेले काम 4 दिवसात सुरू होणार

रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या रखडलेल्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू करण्यासंदर्भात पत्तन विभागाची महत्वाची बैठक झाली.

ठेकेदारासह पत्तनच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. बंधाऱ्याचा काही भागाचा टॉपचा (वरचा) भाग आणि १२०० मीटरचा पूर्ण बंधारा बांधण्याचे काम चार दिवसात सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. पत्तन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन किमीपैकी १२०० मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद निर्माण झाला. जागामालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले; परंतु पावसाळा सुरू झाला तरी अजून या कामाला काही मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत पत्तन विभागाशी चर्चा केली असता हे काम या पावसाळ्यात होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. या बंधाऱ्याचा बेस तयार करण्यासाठी समुद्रात खोदकाम करावे लागणार आहे. आता समुद्राला उधाण असल्याने हे काम करणे शक्य झाले नाही. त्यामुळे १२०० मीटरच्या बंधाऱ्याचा कामाचा मुहूर्त हुकला. पावसाळा संपल्यानंतर हे काम केले जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु हा डेंजर झोन असल्याने या भागात किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्राच्या लाटांचे पाणी वस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात होती. सतर्कता म्हणून धूप झाल्यास तत्काळ दगड आणि टेट्रापॉड टाकून संरक्षित करण्याची तयारी ठेकेदाराने ठेवली होती.

आता पावसाळा संपला असून, पत्तन विभाग शिल्लक कामासाठी ठेकेदाराच्या मागे आहे. पत्तनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कालच ठेकेदाराबरोबर बैठक घेतली. यामध्ये त्यांनी १३०० मीटरच्या बंधाऱ्याचा टॉप पूर्ण करण्यात येणार आहे तर १२०० मीटरचा शिल्लक धूपप्रतिबंधक बंधारा जयहिंद चौक ते पांढरा समुद्र या दरम्यान सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mahrashi karve ANM

ठेकेदाराची वरिष्ठांशी बैठक झाली. या बैठकीमध्ये बंधाऱ्याचे उर्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चार दिवसात बंधाऱ्याचे काम सुरू होईल. – राहुल सिसोदे, पत्तन अभियंता, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 13-11-2024