रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामीण भागातील तरुणाई रोजगारासाठी मोठ्या शहरांचा रस्ता पकडत आहे. त्याचबरोबर महागाईच्या वाढत्या भस्मासुरामुळे दिवसेंदिवस शेतीतील पिकाच्या उत्पन्नापेक्षा तोटाच जास्त होत आहे. त्यामुळे सद्या ग्रामीण भाग ओस पडू लागला आहे. गाव, खेड्यातील लोक शहराकडे वळू लागल्याने त्याचा विपरीत परिणाम गाव, खेड्यांवर होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे शिक्षणामध्ये एकप्रकारे स्पर्धा निर्माण झाली आहे. इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना त्याचा मोठा फटका बसत आहे. खाडीपट्ट्यातील एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या मराठी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. काही ठिकाणी १ तर काही ठिकाणी २ ते ३ पट असलेल्या शाळा पहायला मिळत आहेत. आपल्या गावातील शाळा बंद पडू नये तसेच पुढील मुलांनी दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये याकरिता स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन शाळा वाचविण्याचा प्रयत्न करित असले तरी कित्येक वेळेस यश येत नसल्याचे काही गावांमध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान, बहुतांश पालक हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून परिवारासहित शहराकडे वळत असून, त्या शहरात मिळणारे मोल, मजुरीचे काम करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावली असून, जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही जरी डीजिटल होत असली तरी शाळांमधील घटणारी विद्यार्थ्यांची संख्या शिक्षण खात्याच्या अडचणीची समस्या निर्माण होत आहे. बहुतांश पालक हे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून शहराकडे धाव घेत आहेत. शहरामध्ये मोलमजुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे.
जिल्ह्यात हजार शाळा २० पटसंख्येच्या…
जिल्ह्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडू लागल्याचे सर्वत्र चित्र आहे. १ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ५ पेक्षा कमी पटसंख्या आहे. शून्य पटसंख्या शाळा झाली की ती शाळा बंद पडत आहे. पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 13/Nov/2024














