राजापूर कार्यालयात पाच वर्षांत २५ हजार पासपोर्ट

राजापूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट विभाग सुरू केलेला आहे. नोकरीसह फिरण्यासाठी परदेशवारी करणाऱ्या इच्छुकांना ही सेवा उपयुक्त ठरत आहे. या कार्यालयाचा लाभ घेत गेल्या पाच वर्षांत सुमारे २५ हजारांहून अधिक जणांन पारपत्र (पासपोर्ट) काढला आहे या पासपोर्ट कार्यालयामुळे कोकणातील विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची विमानातून सफर करण्यासह परदेशवारी करण्याची सफर अधिक सुकर झाली आहे.

नोकरी असो वा पर्यटन यांसह अन्य विविध कामानिमित्ताने कोकणातून परदेशामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक जा-ये करत असतात. परदेशामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट असणे महत्वपूर्ण बाब आहे; मात्र, पूर्वी पासपोर्ट कार्यालय मुंबई येथे असल्याने कोकणातील लोकांना पासपोर्ट काढण्यासाठी सुमारे पाचशे किमी अंतर कापून मुंबई गाठावी लागत होती. त्यामध्ये खर्चासह वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होता. त्यामुळे कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी लोकांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन कोकणवासियांची परदेशवारी सुरळीत व्हावी, परदेशवारीसाठी आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी म्हणून कोकणामध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी होत होती. पासपोर्ट कार्यालय मंजूर होऊन येथील पोस्ट कार्यालयामध्ये गेल्या पाच वर्षापासून हे पासपोर्ट कार्यालय सुरू आहे.

खर्चासह वेळेची बचत
राजापूरमध्ये सुरू असलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याचवेळी हे कार्यालय मुंबई-गोवा महामार्गावर आणि शहरातील पोस्ट कार्यालयामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी जा-ये करणे दोन्ही जिल्ह्यांमधील लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामध्ये मुंबई येथे पासपोर्ट काढण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी खर्चासह वेळेचीही बचत होते. त्यामुळे येथील पासपोर्ट कार्यालयाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:50 PM 13/Nov/2024

Mahrashi karve ANM