लोटे : खेड तालुक्यातील आवाशी मधलीवाडी येथील शेतकऱ्याच्या जर्सी गायीचा बिबट्याने फडशा पाडला. या घटनेत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आवाशी परिसरात ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
खेड तालुक्यातील आवाशी मधलीवाडीमधील शेतकरी हरिश्चंद्र राऊत यांची जर्सी गाय बिबट्याने हल्ला करून मारली.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मानवी वस्तीच्या शेजारी बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे पाळीव प्राणी आणि मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे. हरिश्चंद्र राऊत यांची जर्सी गाय वस्तीनजीक असलेल्या गोठ्याबाहेर बाहेर बांधली असताना दि. १३ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि गोठ्यापासून सुमारे ५० ते ६० फूट अंतरापर्यंत ओढत नेले. ही बाब लक्षात आल्यावर शेतकरी राऊत यांनी सरपंच, पोलिस पाटील तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेबाबत सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ही वनविभागाचे कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर फिरकले नव्हते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत विचारले असता, पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याला पकडणे किंवा ठार मारण्याची तरतूद वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यामध्ये नाही, असे सांगण्यात आले. परिणामी स्थानिक ग्रामस्थांमधून माणसांवर हल्ला होण्याची वाट पाहायची का, असा सवाल विचारला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 15/Nov/2024













