दापोली : हर्णे बंदरामध्ये परराज्यांतील नौकेचा हल्ला; तांडेल जखमी

दापोली : राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या केरळ, कर्नाटक या परराज्यांतील नौकांनी धुमाकूळ घातला आहे. १३ तारखेला पुन्हा एकदा हर्णे बंदरातील नौकेवर समुद्रात फास्टर नौकेच्या खलाशांनी हल्ला चढवला. यामध्ये नौकेवरील तांडेल जखमी झाला, तर नौकेचे किमान लाखाचे नुकसान झाले आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने याला आळा घालण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.

हल्ल्यात नुकसान झालेल्या नौकेचा पंचनामा मत्स्य परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी केला आहे. हर्णे बंदरामध्ये साधारण २२ नॉटिकल मैलाच्या आत केरळ, कर्नाटकच्या फास्टर नौका गेली ७ ते ८ वर्षे घुसखोरी करून बेकायदेशीररीत्या मासेमारी करत आहेत. १३ नोव्हेंबरला दुपारी ४ च्या सुमारास हर्णे बंदरामध्ये ६ ते ७ नॉटिकल मैलाच्या अंतरावर सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोर फास्टर नौका मासेमारी करत होत्या. त्या ठिकाणी पाजपंढरी येथील मोरेश्वर कानू चोगले यांची सहा सिलिंडरची मंगलमूर्ती (आयएनडी एमएच ४ एमएम २६३९) मासेमारी नौका जाळे टाकून उभी होती. एका फाइटर नौकने जाळे ओढत असताना मोरेश्वर यांच्या नौकेचा नांगरच ओढत नेला. त्यावेळी बोटीचा नांगर त्यांच्या जाळ्यात अडकला होता.

या नौकेचे तांडेल रत्नाकर धर्मा चोगले त्या फास्टर नौकेच्या खलाशाला जाऊन फक्त नांगर जाळ्यात अडकला आहे, असे सांगताच फास्टर नौकेवरील खलाशांनी नांगर दिला; परंतु त्यांनी तांडेल आणि खलाशांशी उद्धटपणा करून बाचाबाची करायला सुरुवात केली. तेवढ्यात तेथे चार फास्टर नौका आल्या. चोगलेच्या नौकेवर दगडाप्रमाणे कठीण गोलाकार शिश्याच्या गोळ्यांनी हल्ला चढवला. यामध्ये काचा फुटल्या. तांडेल रत्नाकर चोगले जखमी झाले. यावेळी हर्णे बंदरातील नौका वाचवायला आल्या तेव्हा फास्टर नौकांनी पळ काढला.

मत्स्य विभागाचा नाही अंकुश
परराज्यांतील या फास्टर नौकांवर मत्स्य विभागाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. जास्त अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या या नौका बेकायदेशीरपणे राज्याच्या हद्दीमध्ये घुसून मासेमारी करून निघून जातात. ते एवढे निर्वावले आहेत की, समुद्रात अगदी कमी वावामध्ये मासेमारी करतात. त्यांच्यावर मत्स्य विभाग, पोलिस किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेचा अंकुश राहिलेला नाही.

Samarth gold

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:10 PM 16/Nov/2024