साडवली : कोकणातील सण-उत्सवाला सध्या आधुनिकतेचे स्वरूप दिसून येत आहे. त्याप्रमाणे कोकणातील लोक कलेतही ते पाहायला मिळते. मात्र ग्रामीण भागातील लोककलावंत आपली पारंपरिकता आजही जपत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द परबवाडी येथील सुभाष ऊर्फ नाना परब हे सण-उत्सवाच्या काळात अनेक पारंपरिक लोककला जोपासत आहेत.
डफावरील गीतांची शाहिरी, जाखडी, नमन, भजन, कीर्तन, भल्लोरी, बासरीवादन अशा अनेक कला सुभाष ऊर्फ नाना परब हे आज वयाच्या साठीतदेखील जपत आहेत. भजन व कीर्तनातून प्रबोधन, जाखाडीतून स्वरचित गीते त्यांनी गायिली आहेत आणि रसिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. नमन या लोककलेत त्यांनी अनेक पात्रांची वेशभूषा करत उत्तम अभिनयही केला आहे. त्यांच्या पत्नीदेखील महिलांची टिपरी नृत्य असो वा अन्य संस्कृतिक कार्यक्रम असो, त्यात सहभागी होत आपली कला सादर करतात. सण-उत्सवात हे दोघे आपली कला जोपासत आहेत. विशेष म्हणजे कोणतीही वही हातात न घेता पारंपरिक गीते आणि त्यांचा वारसा टिकवण्याचे काम या परब कुटुंबाकडून होत आहे.
आधुनिक युगात परंपरिक लोककलेला सुभाष परब नवा साज चढलेला दिसतो. पारंपरिक गीतांना चित्रपटाच्या चाली आल्याने जुनी गीते आता ऐकायला मिळत नाही. संत मंडळींनी पोवाडा असो, भजन, कीर्तन असो, यातून जुना इतिहास गीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहिचविण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने आपली संस्कृती पुढे सुरु ठेवण्यासाठी लोक कलाकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत परब यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 25/Sep/2024