रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यानात चार महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या २१ फुटी विठ्ठल मूर्तीला आच्छादन घालण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जात हाेते. या मूर्तीच्या साच्यातील गॅपमुळे काही भागाला पाेपडे सुटले आहेत.
त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी या मूर्तीला आच्छादन घालण्यात आल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, शहरातील सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून पूर्ण स्कॅनिंग करून घेतले जाणार आहे.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शासनाने राज्यातील सर्वच पुतळ्यांबाबत दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर परिषद, महानगरपालिकांना सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी शहरातील सहाही पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
माळनाका येथील शामराव पेजे यांचा पुतळा, मारुती मंदिर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लक्ष्मी चौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, थिबा पाॅइंट येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, माळनाका येथील शिर्के उद्यानातील विठ्ठलाची मूर्ती, अशा सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. आता रेडिओलॉजिस्टकडून पुतळ्यांचे संपूर्ण स्कॅनिंग केले जात आहे. यामध्ये पुतळ्याला काही भंग झाला असले तर जे. जे. स्कूल संस्थेकडून दुरुस्ती करून घेतली जाणार आहे.
दरम्यान, माळनाका येथे १ काेटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीच्या साच्यातील गॅपमध्ये काही भागाला पाेपडे सुटले आहेत. त्यामुळे या मूर्तीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. आता मूळ पुतळ्यांचे रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून स्कॅनिंग करून त्यांच्या मजबुतीची खात्री केली जाणार आहे. – यतिराज जाधव, पालिका बांधकाम विभागाचे अभियंता
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 26-09-2024