रत्नागिरी : वडापाव विक्रेता संदीप फटकरेच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतर उकलणार?

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर खानवली फाटा येथील वडापाव विक्रेता संदीप नारायण फटकरे (३३, रा. तळीवाडी चांदोर, रत्नागिरी) याच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे गुढ उकलण्यास मदत होईल, अशी माहिती पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नजित साळोखे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संदिप घरी न परतल्यामुळे त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्यावेळी तो त्याच्या वडापाव गादीमध्येच उपडी पडलेला त्यांना दिसून आला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला प्रथम पावस येथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेले होते. तेव्हा त्या खासगी डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करा, असे त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते; परंतु संदीपला यापूर्वीही चक्कर येण्याचा प्रकार घडल्यामुळे यावेळीही तसाच प्रकार झाला असल्याचा समज करुन नातेवाईकांनी त्याला परस्पर घरी नेले होते.

घरी गेल्यानंतर काही वेळाचत संदीपला श्वास घेण्यास त्रास होउ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. संदिपचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 26/Sep/2024