रायगड मध्ये बंडखोराला साथ देणाऱ्यांवर कारवाई; रत्नागिरीत कधी होणार ? भाजप कार्यकर्त्यांचा सवाल

रत्नागिरी : भाजप चे रायगड जिल्हाध्यक्ष व काही पदाधिकाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीत बंडखोराला साथ दिल्याप्रकरणी सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जे रायगड मध्ये घडले ते रत्नागिरीत देखील घडले, मात्र अजूनही कारवाई झाली नाही. रायगड सारखी कारवाई रत्नागिरीत कधी होणार ? असा सवाल आता भाजप कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या विरोधात भाजपच्या काहींनी उघडपणे तर काहींनी छुप्या पद्धतीने प्रचार केला. याबाबत उदय सामंत यांनी देखील आज पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आहे. काल झालेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात विरोधी प्रचार करणारे काहीजण स्टेजवर देखील होते, त्यांनी भाषणे देखील केली. या सर्व घडामोडीत प्रामाणिकपणे युतीधर्म पाळणाऱ्या पदाधिकार्‍यांना फुल सोडाच साधं विचारले देखील नसल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. भाजपच्या, संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचे काम केले असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मात्र ज्या पदाधिकार्‍यांनी विरोधात काम केले ते काल भाजपच्या व्यासपीठावर होते अशी खंत देखील सामंत यांनी व्यक्त केली आहे.

Ratnagiri Khabardar add image