रत्नागिरी : विकासाला चालना देण्याची भूमिका ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतली पाहिजे. गावात एखादा प्रकल्प येत असेल तर सकारात्मक निर्णय घ्या. त्यासाठी खासकरून महिलांनी पुढे आले पाहिजे. त्या नक्कीच गावाचा कायापालट करतील. पाली ग्रामपंचायतीला ७५ लाख रुपये देऊन नव्याने इमारत बांधली जाणार आहे; पण नव्या इमारतीत गोल गोल खुर्चीवर बसून लोकांना फिरवू नका, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजना २०२४-२५ नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत पाली येथील दीक्षाभूमीवर समाजमंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सरपंच विठ्ठलशेठ सावंत, राहूल पंडित, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्रकाश पवार, रामभाऊ गराटे, एन. जी. मोहिते, उपसरपंच सचिन धाडवे, अनिरूद्ध कांबळे, उपवनसरंक्षक गिरिजा देसाई आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो याची सदैव मला जाणीव आहे. डॉ. आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी दिला आहे. लंडनमधील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक मला पाहायला मिळाले हे मी अभिमानाने सांगतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सरकारमुळे हे स्मारक झाले आहे. देशातले पहिले ध्यानमंदिर रत्नागिरीत होत आहे. या मंदिरावर ४० फूट भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असणार आहे. पाली येथे महिलांसाठी वातानुकूलित सभागृह होत आहे. ओणीला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. प्रास्ताविक निवृत्त नायब तहसीलदार एम. बी. कांबळे यांनी केले. या वेळी रामभाऊ गराटे, अनिरूद्ध कांबळे, संतोष सांवत-देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.
धनादेशाचे वितरण
काही दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या इंदिरा शांताराम धाडवे या नाणीज येथील महिलेला नुकसान भरपाई म्हणून ५ लाखांचा धनादेश पाली येथील कार्यक्रमावेळी वनविभागाकडून देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 26-09-2024