राम मंदिर दान प्रकरणी थेट सत्य बोलल्यास अडचणीत येण्याची बृजभूषण शरण सिंह यांनी व्यक्त केली भीती
अयोध्या राम मंदिर दान प्रकरणी भक्तांनी अर्पण केलेले कोट्यवधी रुपयांचे दान गायब झाल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लावलेल्या या गंभीर आरोपानंतर आता भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी या वादात उडी घेतली आहे. “या संपूर्ण प्रकरणात देशातील खूप मोठे आणि शक्तिशाली लोक सामील असून, मी जर आताच पूर्ण सत्य सांगितले तर स्वतः मोठ्या अडचणीत सापडेन,” असा दावा करत बृजभूषण यांनी या वादात एक नवा वळण आणले आहे.
भीतीपोटी तोंड उघडत नसल्याचा बृजभूषण यांचा थेट दावा
या वादावर आपली अधिकृत प्रतिक्रिया देताना माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कोणत्याही नेत्याचे थेट नाव न घेता मोठी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, “मी जर आज या प्रकरणाचे संपूर्ण सत्य बोललो, तर अनेकांना खूप मोठी इजा पोहोचेल. मी स्वतः वादाच्या भोवऱ्यात अडकेन, कारण यामध्ये जे लोक सामील आहेत ते अत्यंत शक्तिशाली आहेत. म्हणूनच, मी सध्या भीतीपोटी खरं बोलत नाहीये. भीती वाटत असल्यामुळे मी आता सत्य समोर आणू शकत नाही.” योग्य वेळ आल्यावरच मी या विषयावर अधिक बोलेन, असे सांगत त्यांनी तूर्तास यावर जास्त बोलणे टाळले आहे.
अखिलेश यादव यांच्या आरोपांमुळे वादाची ठिणगी
या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सोशल मीडिया पोस्टशी जोडलेली आहे. अखिलेश यादव यांनी राम मंदिरातून कोट्यवधी रुपयांचे दान गायब झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “संपूर्ण जगातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक बातमी आहे की, राम मंदिराच्या दानाची कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाशी जगभरातील सनातनी समाजाची श्रद्धा जोडलेली असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी.”
ट्रस्टचे चंपत राय आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण
अखिलेश यादव यांच्या या आरोपांनंतर ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी तातडीने एक व्हिडिओ जारी करून या आरोपांचे पूर्णपणे खंडन केले आहे. चंपत राय यांनी स्पष्ट केले की, “मंदिरामध्ये सध्या अंतर्गत ऑडिट सुरू आहे. ट्रस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) प्रतिनिधी संयुक्तपणे हे ऑडिट करत आहेत. ही एक नियमित शासकीय व बँकिंग प्रक्रिया असून ऑडिटचे काम अनेक दिवस चालते. सध्या तेच काम सुरू असून, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अफरातफर किंवा संशयास्पद बाब समोर आलेली नाही.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:43 11-06-2026














