चिपळूण तालुक्यातील १७ गावे संभाव्य दरडग्रस्त घोषित; आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर

प्रशासनाकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

चिपळूण तालुक्यातील १७ गावे संभाव्य दरडग्रस्त घोषित करण्यात आली असून, आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे डोंगर भाग असलेल्या चिपळूण तालुक्याला मोठा तडाखा बसतो. हा पूर्वअनुभव लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच चोख सज्जता ठेवली आहे. आपत्तीच्या कालावधीत कोणतीही जीवितहानी होऊ नये या मुख्य उद्देशाने या १७ संवेदनशील ठिकाणी प्रशासनाची २४ तास कायम दक्षता असणार आहे.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व बैठक

चिपळूणचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या आवारात मान्सूनपूर्व तयारी व पुनर्वसन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती आणि धोक्याचा अंदाज घेऊन संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. या निश्चित केलेल्या धोकादायक गावांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

चिपळूण तालुक्यातील ‘या’ गावांचा दरडग्रस्त यादीत समावेश

महसूल प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार, तालुक्यातील खालील गावे आणि त्यांच्याशी संबंधित वाड्यांचा संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे:

  • पेढे, परशुराम आणि परशुराम घाट परिसर
  • तिवरे, रिक्टोली, तिवडी आणि नांदिवसे
  • कादवड, ओवळी, कळकवणे आणि पिंपळी
  • कोळकेवाडी, कुंभार्ली, पेढांबे आणि येगाव
  • कळंबट, गोवळकोट आणि पाचाड

ग्रामस्थांना सतर्कतेच्या नोटिसा आणि सुरक्षित स्थलांतर

मुसळधार पावसामुळे या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा तीव्र धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महसूल प्रशासनाने संबंधित गावांमधील ग्रामस्थांना आधीच सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतरित होण्याच्या अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने मदत कार्य सुरू करता यावे, यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, आणि ग्रामपंचायत या सर्वच विभागांना आपापसात समन्वय ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

पर्यटक आणि नागरिकांसाठी प्रशासनाची नियमावली

मान्सून आढावा बैठकीत केवळ दरडींचाच नव्हे, तर इतर जलस्रोतांच्या धोक्यांचाही आढावा घेण्यात आला. तालुक्यात बंद पडलेल्या व सोडून दिलेल्या चिरे व दगड खाणी, नद्यांचे डोह, तलाव आणि धबधबे या पाण्याच्या ठिकाणांपासून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी दूर राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या पातळीवर व्यापक जनजागृती करावी, तसेच शहरातील धोकादायक फलक व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकावेत, असे निर्देश प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मृद व जलसंधारण आणि जलसंपदा विभागाला दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:43 11-06-2026