देवरुख (संगमेश्वर): संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या तब्बल ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत (Gram Panchayat Reservation Lottery) उद्या, १२ जून रोजी काढण्यात येणार आहे. यामुळे गावागावांतील पारावरच्या आणि चावडीवरच्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेक दिग्गजांची धडधड वाढली आहे.
८८ ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी जाहीर सोडत
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, संगमेश्वर तालुक्यातील सर्व ८८ ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकाच वेळी आणि जाहीररीत्या ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये प्रभागनिहाय जागांचे आरक्षण खालील प्रवर्गांसाठी निश्चित केले जाईल:
- एससी (SC – अनुसूचित जाती)
- एसटी (ST – अनुसूचित जमाती)
- ओबीसी (OBC – नागरिक मागास प्रवर्ग)
- महिला आरक्षण (सर्व प्रवर्गांतील ५०% महिला जागा)
विशेष म्हणजे, या सर्व ८८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले असून, आता सदस्यपदांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.
पावसाळ्यानंतर रंगणार निवडणुकीची रणधुमाळी?
निवडणुकीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, कोकणातील मुसळधार पाऊस आणि सध्या सुरू असलेली शेतीची कामे (भात लावणी) पाहता, या निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरीही आरक्षण सोडत आधी होत असल्याने राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दिग्गजांची धाकधुक वाढली; नव्या दमाचे तरुण मैदानात!
उद्या होणाऱ्या या सोडतीवर अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. एखादा प्रभाग महिला किंवा इतर प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास दिग्गजांना पत्ता कट होण्याची भीती आहे. दुसरीकडे, या बदलेल्या गणितांमुळे गावागावांत नव्या दमाचे तरुण आणि नवीन चेहरे निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 11-06-2026














