महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठा विजय मिळाला आहे. तर लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) लाजीरवाणा पराभव झाला आहे.

यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत असून महायुती सरकारचा (Mahayuti Government) शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. मात्र यामुळे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी (Maharashtra CM) देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात

आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नेमका कुठे पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुहायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत होता. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांचीदेखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 29-11-2024