दापोली : दापोली पोलिसांच्या घराचे स्वप्न अखेर साकारताना दिसत असून, या प्रकल्पात पाच मजली दोन इमारतीत 46 सुसज्ज घरे असणार आहेत तर अधिकार्यांसाठी देखील स्वतंत्र इमारत उभी राहणार आहे.
पोलिसांच्या निवासी इमारतींच्या कामाला नुकताच शुभारंभ झाला आहे. सध्या दापोली पोलीस ठाण्यात 65 पोलिस कर्मचार्यांची आवश्यकता असताना 50 पोलिस कर्मचारी सेवेवर आहे. या सर्वांना येथे रहायला घरे मिळणार आहेत. यामुळे त्यांचा दापोली शहरात इतरत्र घर घेऊन देण्यात येणारे भाडे वाचणार आहे. शिवाय यामुळे दापोली पोलिसांचे स्वत:च्या सुसज्ज इमारतीचे स्वप्न पूर्णत्वात जाणार आहे.
दापोली पोलिस ठाणे व दापोलीतील पोलिस वसाहत ही इंग्रजांच्या काळात बांधलेल्या इमारती होत्या. या इमारती फारच जुनाट झालेल्या होत्या. यामुळे या वसाहतीत पोलिसांना राहणे कठीण झाले होते. यामुळे अनेक पोलिस अधिकारी दापोली शहरात भाड्याने घर अथवा सदनिका घेऊन राहत होते तर पोलिस कर्मचारी देखील शहरात इतरत्र राहत होते. त्यातच दापोली पोलीस ठाण्याची इमारत सुमारे दोन वर्षांपूर्वी अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. या नंतर या इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यात पुन्हा पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू झाले. मात्र, पोलिसांच्या निवासस्थानाचे काम मागे पडले होते. येथील पोलिस ठाण्याच्या बाजूला एक सभागृह बांधण्यात आले होते. या सभागृहात त्यावेळी तात्पुरती पोलीस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता नव्याने बांधण्यात येणार्या पोलिस वसाहती करिता हे सभागृह देखील जमीनदोस्त करण्यात आलेले आहे. आता या जागी पोलीस कर्मचारी निवासाच्या प्रत्येकी 23 सदनिका असणार्या पाच मजली दोन इमारती उभ्या राहणार आहेत. या इमारती लिफ्टने सुसज्ज असतील. शिवाय पोलिस स्थानकातील अधिकार्यांंकरिता चार निवासिका असणारे चार मजली इमारत बांधण्यात येणार आहेत.
सध्या अस्तित्वात असणार्या पोलीस ठाण्याच्या बाजूला दोन मजली सुसज्य असे पोलिस स्थानक बांधण्यात येणार आहे. शिवाय पोलिस वसाहतीतील लहान मुलांना खेळण्याकरिता येथे गार्डन देखील बांधण्यात येणार आहे. हे काम पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ, वरळी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांना प्रत्यक्ष घराचा ताबा मिळण्याकरिता अजून दीड ते दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:02 02-12-2024














