दापोली : मंदिरात चोरी करणारा संशयित पाच तासांत जेरबंद

दापोली : तालुक्यातील चंद्रनगर येथील मंदिरात झालेल्या चोरीचा तपास दापोली पोलिसांनी अवघ्या पाच तासात लावून संशयिताला ताब्यात घेतले. महेंद्र सीताराम पवार (वय ४७, रा. पांगारवाडी, जालगाव) असे त्याचे नाव आहे.

चंद्रनगर येथे चोरी झाल्याचे शुक्रवारी (३० नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास उघड झाले. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान चंद्रनगर गावचे पुजारी यशवंत देवजी मुलुख हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी घाणेकरीन मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचे दिसून आले. म्हणून त्यांनी गावातील लोकांना तसेच मंदिर कमिटी व प्रवीण मुलुख यांना बोलावून घेतले. या सर्वांनी मंदिरात पाहिले असता मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ६ हजार ५० रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी प्रवीण मुलुख यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता संशयित महेंद्र सीताराम पवार (वय ४७, रा. पांगारवाडी, जालगाव) हा दिसून आला. त्याला सायंकाळी सव्वासत्या सुमारास पोलिसांनी अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार ७७० रुपये हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलिस निरीक्षक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमोल बनकर, हेडकॉन्स्टेबल अजित गुजर, हवालदार मिथून मस्कर यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 02/Dec/2024

Samarth gold